सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून, कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने भिलवडी आणि आसपासच्या परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांसमोर पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी भिलवडी येथे कोरड्या नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले.
पलूस तालुक्यातील कृष्णा नदीकाठच्या भागात पाणीटंचाईचा परिणाम पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्या पाण्यावरही होत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले.
येत्या दोन दिवसांत कृष्णा नदीत पाणी सोडण्यात आले नाही, तर प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विश्वजीत कदम यांनी दिला. नदीपात्रात पाणी सोडण्याच्या मागणीमुळे आता प्रशासनाच्या भूमिकेकडे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.


