कोकण किनारपट्टीवरील मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मच्छिमारांना बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देणे, मासळीचे उत्पादन वाढवणे आणि शासकीय स्तरावरील अडचणी दूर करणे, या विषयांवर कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. आमदार नितेश राणे यांनी याबाबत माहिती दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यशाळेत राज्य सहकारी बँक, नाबार्ड तसेच कोकणातील विविध सहकारी बँकांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर आणि नाबार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मच्छिमारांना आर्थिक सहकार्य कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल, यावर सविस्तर चर्चा झाली.
कोकणातील मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी बँकिंग क्षेत्राचे सहकार्य महत्त्वाचे ठरू शकते. मच्छिमारांना आर्थिक मदत उपलब्ध करून देतानाच त्यांच्या व्यवसायातील अडचणी दूर करणे आणि मासळीचे उत्पादन वाढवण्यासाठी उपाययोजना करणे, यावर कार्यशाळेत भर देण्यात आला.
शासनाने मासेमारी व्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्यानंतर मच्छिमारांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढील पावले उचलण्याची गरज असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. मच्छिमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकिंग संस्था, नाबार्ड आणि संबंधित यंत्रणांना एकाच व्यासपीठावर आणून ठोस आराखडा तयार करण्याचा या कार्यशाळेचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमातून कोकणातील मच्छिमारांना आर्थिक सहकार्य मिळवून देण्यासाठी आणि मत्स्य व्यवसायाच्या विकासाला चालना देण्यासाठी पुढील उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.


