नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर कोजागरी पौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने वाहतूक निर्बंधांच्या कालावधीत बदल केला आहे. सुधारित आदेशानुसार नांदुरी ते सप्तशृंगी गड या मार्गावर २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून ते २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत खासगी वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.

 

 

 

या निर्बंधांमध्ये खासगी चारचाकी, दुचाकी, ऑटोरिक्षा आणि इतर भाडोत्री वाहनांचा समावेश आहे. या मार्गावर केवळ राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसना परवानगी देण्यात आली आहे.

कोजागरी पौर्णिमेनिमित्त राज्याच्या विविध भागांतून भाविक सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येतात. गडाकडे जाणारा घाटरस्ता अरुंद आणि वळणावळणाचा असल्याने गर्दीच्या काळात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. भाविकांची सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रवेशबंदीचा कालावधी आधीपासून लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

 

 

भाविकांनी गडावर जाण्यासाठी प्रवासाचे नियोजन करताना सुधारित आदेशाची नोंद घ्यावी. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीनुसार निर्बंधांमध्ये बदल करण्याचा अधिकार प्रशासनाने राखून ठेवला आहे.