महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि परीक्षांच्या अनिश्चित वेळापत्रकाच्या मुद्द्यावरून युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आलं.
युवक काँग्रेसचे नाशिक शहर-जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयेश पोखळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आलं. MPSC परीक्षांच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, कथित गैरप्रकारांची चौकशी करावी आणि परीक्षांचं वेळापत्रक निश्चित व स्पष्ट असावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
MPSC परीक्षांमधील पेपरफुटी आणि विविध अनियमिततेच्या आरोपांमुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांमध्ये अस्वस्थता असल्याचं विविध आंदोलनांमधून समोर आलं आहे. नाशिकमध्येही यापूर्वी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेची मागणी केली होती.
दरम्यान, MPSC परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या तक्रारींची फेरतपासणी आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याबाबत सरकारकडून निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता युवक काँग्रेसने दिलेल्या निवेदनानंतर सरकार आणि MPSC प्रशासनाकडून पुढील कोणती पावलं उचलली जातात, याकडे लक्ष लागलं आहे.


