नाशिक:

नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आणि प्रशासनाच्या सतर्कतेच्या आवाहनाचा परिणाम शहरात स्पष्टपणे दिसून आला. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नेहमी गजबजलेला काठे गल्ली–सिन्नर फाटा मार्ग आज जवळपास ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नाशिक रोड, देवळाली कॅम्प, जेल रोड आणि पुणे रोड परिसरातून शहरात येणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळल्याने या मार्गावरील वाहतुकीत लक्षणीय घट झाली.

नेहमी वाहनांच्या गर्दीने गजबजणाऱ्या या रस्त्यावर आज तुरळक वाहनेच दिसून आली. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर अतिवृष्टीच्या इशाऱ्याचा आणि नागरिकांच्या सतर्कतेचा थेट परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.