नाशिक : शहरातील बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २४ लाख ४३ हजार रुपये किमतीचे १६३ ग्रॅम ६६ मिलिग्राम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील तब्बल १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

जावेद अब्दुल गफ्फार (वय ४०) आणि अरुणकुमार प्रेमदत्त शर्मा (वय ५६, दोघे रा. जिल्हा बिजनौर, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने ही कामगिरी केली. मंगळवारी बसस्थानक परिसरात चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची गोपनीय माहिती अंमलदार आप्पा पानवळ व गोरख साबळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
 

१० घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल

पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत संशयितांनी शहरातील सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७, पंचवटी हद्दीत १ आणि मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत २ अशा एकूण १० चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.