नाशिकरोड परिसरातील चेहेडी बुद्रुक येथील म्हस्के मळ्यात बिबट्याचा वावर पुन्हा दिसून आला आहे. आज पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने बंगल्याबाहेर पिंजऱ्यात बंद असलेल्या कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्रा पिंजऱ्यात सुरक्षित असल्याने त्याचा जीव वाचला. बिबट्याच्या हालचाली बंगल्याबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.

 

म्हस्के मळा, चेहेडी बुद्रुक आणि चाडेगाव परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर दिसून येत आहे. यापूर्वी २९ ऑगस्ट रोजी चाडेगाव परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेलेल्या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला होता. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी चेहेडी परिसरातही कुत्र्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली होती.

 

आता पुन्हा एकदा बिबट्याच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून पिंजरे लावण्यात येत असले, तरी या उपाययोजनांच्या परिणामकारकतेवर स्थानिक शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

परिसरातील बिबट्याचा वावर लक्षात घेता वन विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून पुढे कोणती पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.