नाशिक जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरूच असल्याचे चित्र आहे. ६ ऑगस्टला सुरगाणा, कळवण आणि पेठ तालुक्यात अनेक सौम्य धक्के जाणवल्यानंतर आता ८ ऑगस्टच्या रात्री नाशिकसह जिल्ह्यातील अनेक भागांना पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी होती.

६ ऑगस्टला सुरगाणा तालुक्यात दिवसभरात भूकंपाचे पाच सौम्य धक्के जाणवले होते. सकाळपासून दुपारपर्यंत झालेल्या या धक्क्यांमध्ये सर्वाधिक ३.६ रिश्टर स्केलच्या धक्क्याची नोंद झाली होती. कळवण तालुक्यातील दळवट तसेच पेठ तालुक्यातील आसरबारी परिसरातही त्याच दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले होते.

यानंतर ८ ऑगस्टच्या रात्री पुन्हा नाशिक जिल्ह्याला भूकंपाचा हादरा बसला. रात्री सुमारे १० वाजून १ मिनिटाच्या सुमारास हा भूकंप जाणवला. सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड, पेठ, दिंडोरी, नाशिक आणि निफाड तालुक्यातील काही भागांत नागरिकांना धक्के जाणवल्याची माहिती आहे.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीनुसार या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे पाच किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची माहिती अद्याप प्रशासनाला मिळालेली नाही. मात्र, दोन दिवसांच्या अंतराने पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.