गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून नाशिकच्या बाजारपेठेत गणेश सजावटीच्या साहित्याची मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे. यंदा विशेषतः इको-फ्रेंडली डेकोरेशनला ग्राहकांची वाढती पसंती मिळत असून, विविध आकर्षक डिझाईन्स आणि आकारांमधील सजावटी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.

दीड फुटापासून तब्बल सात फुटांपर्यंत विविध आकारातील सजावट ग्राहकांचं लक्ष वेधून घेत आहे. मंदिराच्या स्वरूपातील सजावट, आकर्षक डिझाईन्स तसेच पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेल्या सजावटींना चांगली मागणी असल्याचं विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

या सजावटींची सुरुवातीची किंमत साधारण १ हजार ५०० रुपयांपासून आहे. सजावटीचा आकार, डिझाईन आणि साहित्य यानुसार किमतीत वाढ होत आहे. घरगुती गणपतींसाठी छोट्या सजावटींपासून ते मोठ्या गणेश मंडळांसाठी भव्य डेकोरेशनपर्यंत विविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.

यंदा नवीन आणि आकर्षक डिझाईन्ससोबतच पर्यावरणपूरक सजावटीकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे. गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत पर्यावरणाची काळजी घेण्याचा प्रयत्नही नागरिकांकडून केला जात असल्याचं चित्र आहे.

त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकची बाजारपेठ सजावटीच्या साहित्याने गजबजली असून, इको-फ्रेंडली डेकोरेशनला मिळणारा प्रतिसाद यंदाच्या गणेशोत्सवातील महत्त्वाचा ट्रेंड ठरत आहे.