नवी मुंबई :   राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावरही दिसू लागला आहे. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने अनेक भाज्यांच्या दरात ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडू लागला आहे.

 

https://www.aplanashik24.tv/nashik-news/nashik-kumbh-road-work-gangapur-road-damaged-rain 

 

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, पावसामुळे विविध भागांतून येणाऱ्या भाजीपाल्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. परिणामी आज बाजारात केवळ ५१० वाहनांमधून भाजीपाला दाखल झाला. आवक कमी झाल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा घटला आणि त्याचा थेट परिणाम दरवाढीच्या स्वरूपात दिसून आला.

सध्या बाजारात फ्लॉवर २४ रुपये, गवार ६० रुपये, शेवगा ३० रुपये, दुधी २० रुपये, भेंडी ४० रुपये, शिमला मिरची ५५ रुपये, वाटाणा ९० रुपये आणि काकडी २० ते २४ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. अनेक भाज्यांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे ग्राहकांना नेहमीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

भाजी विक्रेत्यांच्या मते, पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही दिवसांतही भाज्यांच्या आवकेत घट होण्याची शक्यता असून दर आणखी वाढू शकतात. त्यामुळे आगामी काळात महागाईचा फटका अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.