नाशिक शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या गंगापूर धरणावर तब्बल चार वर्षांनंतर पारंपरिक जलपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला. महापालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने मागील चार वर्षांपासून हा पारंपरिक सोहळा आयोजित करण्यात आला नव्हता. यंदा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली.
महापौर हिमगौरी अडके यांच्या हस्ते गंगापूर धरणाची विधिवत पूजा करण्यात आली. मंत्रोच्चारात श्रीफळ अर्पण करून नाशिक शहराच्या सुख-समृद्धीसह अखंड पाणीपुरवठ्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त मनीषा खत्री, सभापती मच्छिंद्र सानप, विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक तसेच मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी पारंपरिक पद्धतीने जलपूजनात सहभाग नोंदवला.
चार वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झालेल्या या जलपूजन सोहळ्यामुळे नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेला नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.


