सततच्या पावसामुळे नाशिक रोड परिसरातील रस्त्यांची अवस्था खराब झाली असून उड्डाण पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

पावसाच्या पाण्यासोबत पुलावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने दुचाकीस्वारांना विशेष अडचणींचा सामना करावा लागत आहे. घसरून अपघात होण्याची शक्यता वाढल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत पुलावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने प्रवाशांचा वेळ वाया जात असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाकडून उड्डाण पुलावरील चिखल हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र केवळ तात्पुरती स्वच्छता न करता पुलावरील खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.