नाशिक शहरातील मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता महापालिकेच्या महासभेतही गाजला आहे. शहरातील विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचे घोळके फिरताना दिसत असून, रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या मागे कुत्रे लागण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना काळजी घ्यावी लागत असून, या समस्येवर महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा मुद्दा महापालिकेच्या महासभेत उपस्थित करताना नगरसेविका संध्या कुलकर्णी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. गेल्या चार वर्षांपासून या प्रश्नावर महापालिका प्रशासनाकडे कामकाज सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात ठोस नियोजन काय आहे? असा सवाल महासभेत उपस्थित करण्यात आला.

मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी Sterilization अर्थात निर्बीजीकरणाची कारवाई किती प्रमाणात करण्यात आली, याची माहितीही प्रशासनाने द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष परिस्थितीत बदल दिसणे आवश्यक असल्याचेही नागरिकांकडून सांगितले जात आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचे घोळके दिसत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मोकाट कुत्र्यांमुळे धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत.

गेल्या चार वर्षांपासून कायम असलेल्या या समस्येवर आता महापालिका प्रशासन नेमकी काय ठोस Action घेणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि निर्बीजीकरणासह प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी महासभेत करण्यात आली आहे.