नाशिकच्या सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये ड्रेनेजच्या पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. या समस्येबाबत महिलांनी सिडको विभागीय कार्यालयात निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
महिलांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दीड महिन्यांपासून ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत असून सुमारे 70 घरांपर्यंत त्याचा परिणाम होत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील रहिवाशांना दररोज या सांडपाण्यातून ये-जा करावी लागत असल्याचा दावा त्यांनी केला.
यापूर्वी ऑनलाइन तक्रारींसह संबंधित अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनाही वारंवार निवेदने देण्यात आल्याचे महिलांनी सांगितले. मात्र अद्यापही समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
समस्या तातडीने सोडवली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महिलांनी दिला आहे.


