सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra modi) देशवासीयांना काही महत्त्वाचे आवाहन केल्यानंतर, पेट्रोल-डिझेल आणि सोन्यासंदर्भात खरेदी कमी करण्याचं सूचवल्यानंतर दोन दिवसांतच या सर्वांचे भाव वाढले. देशात पेट्रोल आणि डिझेलमध्ये 3 रुपयांची वाढ झाली असून नागरिकांनी, विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसकडून काही ठिकाणी या दरवाढीविरोधात आंदोलने केली जात आहेत. आता, देशातील या आर्थिक परिस्थितीवर महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाष्य केले आहे. आज 96 रुपयाला मिळणारा डॉलर महिन्याभरात 100 रुपयांवर जाईल. तर, महिनाभरात पेट्रोल (Petrol) 120 ते 130 रुपयावर जाईल, अशी धोक्याची घंटाच जयंत पाटील यांनी सांगितली. जयंत पाटील यांनी यावेळी, वाशिमधील पेट्रोल पंपावर ड्रम घेऊन मारामारी सुरू असल्याचंही सांगितलं.
कोरोनाच्या वेळी एकदा लॉकडाऊन झाला होता, आता आपोआपच लॉकडाऊन होईल अशी परिस्थिती आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी भविष्यातील अडचणी आणि धोके सांगितले आहेत. ईश्वरपूरमध्ये शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात जयंत पाटील बोलत होते.
देशाच्या गृहमंत्र्यांनी पंधरा दिवसापूर्वीच आपल्याकडे सहा महिने पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा साठा आहे, असं सांगितलं होतं. त्याला अजून महिना झाला नाही, तोवर देशाच्या पंतप्रधानानी खर्च कमी करण्याच्या सूचना देशवासियांना केल्या. अशाच पद्धतीची भूमिका 2013 साली आर्थिक परिस्थिती काठावर आल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतली होती. त्यावेळी आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी देशाची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे, अशा पद्धतीचा ट्विट केलं होतं. मात्र, तेच मुख्यमंत्री आज पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाची थट्टा करू नका, असे ट्विट करता आहेत, असे म्हणत जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही लक्ष्य केलं.
आता, पंतप्रधानांनी आपला कॅनव्हा कमी करत दोन गाड्यावर ताफा आणला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर दुचाकीवरून फिरायला लागलेत. याचं अनुकरण महाराष्ट्रातील सर्व मंत्री करतील आणि सर्व मंत्रिमंडळ दुचाकीवर येईल अशी अपेक्षा करूया, असेही जयंत पाटील म्हणाले. देशावर आर्थिक संकट आलं की पहिला शेतकरी, शेतमजूर भरडला जातो, त्यामुळे या संकटातून कसं बाहेर पडायचं यावर विचार करण्याची गरज आहे. आजच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी लोक रांगा करत आहेत, वाशिमध्ये चक्क ड्रम घेऊन मारामारी सुरू असल्याचंही मी व्हिडिओत पाहिलं, असं उदाहरण देखील जयंत पाटील यांनी यावेळी दिलं.
वाशिमचा व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर
वाशिम जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावरील गर्दीचा आणि वादाचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून यात प्रामुख्याने शेतकरी वर्ग अधिक दिसतोय. पेट्रोल, डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतीची काम रखडत असल्याने पेट्रोल पंपांवर गर्दी आणि यातूनच वाद वाढताना दिसत आहे. बुलढाणा, परभणी, बीड आदी जिल्ह्यांमध्येही अशीच अवस्था असून आमची मागणी आहे की पावसाळा तोंडावर आल्याने सरकारने शेतीसाठी प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून दिलं पाहिजे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ही तर सुरवात आहे, यापुढे इंधनाचं नीट नियोजन केले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, याची सरकारने नोंद घ्यावी. इंधन तुटवड्याचा प्रश्न जागतिक अस्थिरतेमुळं नव्हे तर भाजप सरकारच्या कुपोषित धोरणांमुळं तयार झाला आहे. 2013 मध्ये महागाईला आणि इंधन दरवाढीला केंद्राचं अपयश संबोधणारे फडणवीस साहेब आजच्या या परिस्थितीबद्दल कुणाला जबाबदार धरणार? असा सवालही रोहित पवार यांनी विचारला.


