नाशिक शहरातील रस्ते खोदाईच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या महासभेत जोरदार खडाजंगी झाली. गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी MNGLकडून करण्यात येणाऱ्या खोदाईवर नगरसेवकांनी आक्षेप घेत प्रशासनाला जाब विचारला. या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आडके यांनी MNGLच्या रस्ते खोदाईची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या महासभेत शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा चर्चेत आला. गॅस पाइपलाइनची खोदाई, सिंहस्थ प्राधिकरणाची कामे आणि स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांमुळे रस्त्यांची अवस्था खराब झाल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला.
MNGLने परवानगीपेक्षा अधिक खोदाई केली असल्याचे आढळल्यास संबंधितांकडून तिप्पट दंड वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच MNGLचे नाशिक विभागीय अधिकारी संदीप श्रीवास्तव यांच्या बदली आणि निलंबनाचा प्रस्ताव शासन तसेच कंपनीच्या मुख्यालयाकडे पाठवण्याचा निर्णय महासभेत जाहीर करण्यात आला.
याशिवाय घरगुती गॅस कनेक्शनची प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत MNGLला देण्यात आली आहे. ही मुदत पाळली नाही तर MNGLविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रस्ते खोदाईनंतर खड्डे बुजवण्याच्या कामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांवरही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित ठेकेदारांना दररोज एक लाख रुपयांचा दंड करण्याचे तसेच खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, रस्ते तयार केल्यानंतर पुन्हा खोदाई होऊ नये, यासाठी विविध विभाग आणि कंपन्यांमध्ये योग्य समन्वय असणे गरजेचे असल्याची भूमिका महासभेत मांडण्यात आली. आता MNGLच्या खोदाईच्या चौकशीत नेमके काय समोर येते आणि संबंधितांवर कोणती कारवाई होते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.


