अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात माणुसकी आणि नात्यातील प्रेमाचा हृदयस्पर्शी अनुभव देणारी घटना घडली आहे. किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या जावयाला त्याच्या सासूने स्वतःची किडनी दान करत नवजीवन दिले. रुग्णालयात पार पडलेली ही ७५ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे.
पारडी येथील देवानंद चव्हाण यांच्यावर यापूर्वीही किडनी प्रत्यारोपण झाले होते. मात्र काही काळानंतर ती किडनी पुन्हा निकामी झाली. त्यानंतर योग्य दात्याचा शोध सुरू असताना त्यांच्या सासू रंजना सोळंके यांनी पुढाकार घेत स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने अत्यंत गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. सध्या दाता आणि रुग्ण दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
विशेष म्हणजे ही संपूर्ण शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आली. या घटनेमुळे अवयवदानाबाबत समाजात सकारात्मक संदेश गेला असून, मायेचे आणि नात्यांचे हे अनोखे उदाहरण सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.


