संत देवमामलेदार यशवंतराव महाराजांचा २११ वा जन्मोत्सव सटाण्यात भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जन्मोत्सवानिमित्त देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

जन्मोत्सवाच्या निमित्ताने पहाटे महाराजांच्या मूर्तीवर महापूजा आणि अभिषेक करण्यात आला. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, अरुणाताई बागड, सचिव हेमंत सोनवणे आणि लताबाई सोनवणे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांचं दर्शन घेतलं.

ह.भ.प. सुदर्शन महाराज पिंपळकोठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्री यशवंत लीलामृत’ ग्रंथाचं पारायण करण्यात आलं. या पारायणात ४५ भाविक सहभागी झाले होते.

जन्मोत्सवाचं आणखी एक आकर्षण ठरलं ते म्हणजे २११ किलो वजनाचा बुंदीचा लाडू. राजस स्वीट्सच्या वतीने हा विशेष लाडू तयार करण्यात आला होता. त्याचा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला.

तसंच जन्मोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसादाचा सुमारे ५०० भाविकांनी लाभ घेतला. दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

यावेळी नगराध्यक्ष हर्षदा पाटील, प्रांताधिकारी महेश शेलार, तहसीलदार कैलास चावडे, मुख्याधिकारी ज्योती भगत यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला.