चांदवड : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील बोराळे गावात शेतीच्या वादाला हिंसक वळण लागल्याची घटना समोर आली आहे. या वादातून टोमॅटो शेतीची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे २० ते २५ जणांचे टोळके हातात लाठ्याकाठ्या घेऊन संबंधित शेतात घुसले. यावेळी त्यांनी फिर्यादी शेतकऱ्याला दमदाटी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर शेतातील टोमॅटो पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली.
याचवेळी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतातील शौचालय पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच टोमॅटो लागवडीसाठी वापरण्यात आलेले मल्चिंग पेपर आणि ड्रिप सिंचन यंत्रणेचेही नुकसान करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
https://www.aplanashik24.tv/crime-news/pune-vidyarthini-atyachar-prakrani-robotics-shikshak-atket
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.


