आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांवरून आदिवासी एकता संघटना आक्रमक झाली आहे. विविध मागण्यांसाठी आज नाशिकमधील आदिवासी विकास कार्यालयावर आदिवासी एकतेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याचा आरोप करत आंदोलकांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
मागील दोन वर्षांतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
गडचिरोलीतील आश्रमशाळेत मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये, तर जखमी विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
याशिवाय आदिवासींच्या नोकरी भरतीची प्रलंबित प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अनधिकृत फी वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
आश्रमशाळांमधील सेंट्रल किचन पद्धत बंद करून दररोज मेस सुविधा सुरू करावी, अशीही भूमिका आंदोलकांनी मांडली.
विविध मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.


