नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते शहरासह जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शैक्षणिक, वाहतूक आणि आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित विविध कार्यक्रम आज पार पडणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपपरिसरातील प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यासोबतच दिंडोरी येथील कृषी महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचेही उद्घाटन होणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही या दौऱ्यात महत्त्व मिळणार असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ५० ई-बसेसचे लोकार्पण करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्याच्या दृष्टीने ई-बसेसचा समावेश महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, सिंहस्थ महाकुंभ २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आजपासून तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ महोत्सवाला सुरुवात होत आहे. ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

‘कुंभ भक्ती संगम’च्या माध्यमातून देशभरातील विविध भक्ती परंपरा, कीर्तन आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचा अनोखा संगम नाशिककरांना अनुभवता येणार आहे. २८, २९ आणि ३० ऑगस्ट असे तीन दिवस हा महोत्सव रंगणार असून भाविक, नाशिककर आणि रसिकांसाठी विविध भक्तीपर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या महोत्सवात प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यात एकाच दिवशी शैक्षणिक प्रकल्पांचे उद्घाटन, ५० ई-बसेसचे लोकार्पण आणि ‘कुंभ भक्ती संगम’ महोत्सवाचे उद्घाटन असे विविध कार्यक्रम होणार असल्याने नाशिकसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.

सिंहस्थ महाकुंभ २०२७च्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ‘कुंभ भक्ती संगम’ हा महोत्सव नाशिकच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाला नवी ऊर्जा देणारा ठरणार का, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

न्यूज डेस्क | आपलं नाशिक