नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर इगतपुरी तालुक्यातील निसर्गसौंदर्य खुलून आले असून प्रसिद्ध ऊंट दरी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबई–नाशिक महामार्गावरील नवीन कसारा घाट परिसर आणि ऊंट दरी येथे राज्याच्या विविध भागांतून पर्यटक दाखल होत असून धुके, धबधबे आणि हिरवाईचा मनमुराद आनंद घेत आहेत.

इगतपुरी तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवाईने नटला आहे. नवीन कसारा घाटाच्या माथ्यावर तसेच घाटणदेवी मंदिरासमोरील ऊंट दरी येथे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. धुक्याने वेढलेल्या डोंगररांगा आणि उंच कड्यांवरून कोसळणारे धबधबे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत.

शहापूर वनविभागाने विकसित केलेल्या या पर्यटनस्थळी अनेक पर्यटक छायाचित्रे आणि सेल्फी काढताना दिसत आहेत. थंडगार वातावरणामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून स्थानिक विक्रेत्यांकडे भाजलेला मका, गरमागरम मॅगी आणि चहाचा आस्वाद घेण्यासाठीही पर्यटकांची गर्दी होत आहे.

यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाली असली तरी आता इगतपुरीचा पर्यटन हंगाम बहरात आला आहे. दरम्यान, पर्यटनस्थळी भेट देणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.