नाशिकच्या मखमलाबाद रस्त्यावरील सुरू असलेल्या रस्ते कामावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलने रस्ते कामादरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली आहे.

ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड यांनी मखमलाबाद रस्ता अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कामाच्या ठिकाणी बॅरिकेडिंग, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर आणि इतर आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

निवेदनात २३ जुलै रोजी रात्री एका चारचाकी वाहनाचा खोदलेल्या खड्ड्यात अपघात झाल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रस्ते कामातील सुरक्षेच्या उपाययोजनांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.