शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर आता महापौर हिमगौरी आडके यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून होत असलेल्या टीकेवर बोलताना महापौरांनी प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
नाशिक शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात रस्त्यांची पाहणी करत प्रशासनावर निशाणा साधला होता. त्यानंतर महापौर हिमगौरी आडके यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना उत्तर दिलं.
शहरातील रस्ते सर्वांनाच चांगले हवे आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासन गेल्या काही दिवसांपासून २४ तास काम करत असल्याचा दावा महापौरांनी केला. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू असून, यासंदर्भातील जिओ टॅग फोटो उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आंदोलन करण्याऐवजी विकासकामांमध्ये सहकार्य केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं, अशी भूमिका महापौरांनी मांडली. शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, रस्ते सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या कामांच्या डीपीआरला महासभेने मंजुरी दिल्याची माहितीही महापौरांनी दिली. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत महापौरांनी प्रशासनाच्या कामांचा बचाव केला आहे.
आता नाशिक शहरातील रस्त्यांची परिस्थिती प्रत्यक्षात कितपत सुधारते आणि नागरिकांना खड्ड्यांपासून कधी दिलासा मिळतो, याकडे लक्ष लागलं आहे.


