नाशिकच्या कालिदास कला मंदिरात नटराज पंडित गोपीकृष्ण जयंती महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भारतीय शास्त्रीय नृत्याच्या विविध शैलींचे मनमोहक सादरीकरण करण्यात आले.
मणिपुरी आणि कुचीपुडी नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. कलाकारांच्या लयबद्ध हालचाली, भावमुद्रा आणि अभिनयकौशल्याला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
महोत्सवात ‘हरिनाम प्रचार’ या सादरीकरणातून भक्तिरसाची भावपूर्ण अनुभूती रसिकांना मिळाली. तर ऋतिक वेंकट यांनी कुचीपुडी शैलीतील दुर्मिळ ‘अर्धनारीश्वर’ रचना सादर केली.
नृत्याच्या माध्यमातून लय, ताल, अभिनय आणि भाव यांचा सुंदर मिलाफ या सादरीकरणातून पाहायला मिळाला. कलाकारांनी आपल्या कौशल्याने उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी नृत्यकला ही लिंगभेदाच्या पलीकडे असून प्रत्येक कलाकाराला समान सन्मान मिळायला हवा, अशी भावनाही व्यक्त करण्यात आली.
भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेचे समृद्ध वैभव नाशिककरांना अनुभवता यावे, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.


