राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे महाअधिवेशन येत्या ७ ऑगस्ट रोजी बंगळुरू येथे आयोजित करण्यात आले आहे. देशभरातील ओबीसी समाजाचे नेते, लोकप्रतिनिधी आणि विविध राज्यांतील प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी होणार असून, सामाजिक न्याय आणि ओबीसी हक्कांवर व्यापक चर्चा होणार आहे.
हे अधिवेशन ज्ञानज्योती ऑडिटोरियम, सेंट जोसेफ युनिव्हर्सिटी, बंगळुरू येथे पार पडणार आहे. अधिवेशनात देशभरातील ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार तसेच विविध राज्यांतील प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
अधिवेशनात ओबीसी समाजाशी संबंधित विविध प्रश्न, आरक्षण, सामाजिक न्याय, शैक्षणिक आणि राजकीय प्रतिनिधित्व यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. यासाठी दोन स्वतंत्र सत्रांचे आयोजन करण्यात आले असून विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
या अधिवेशनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर ओबीसी समाजाशी संबंधित प्रश्नांवर भूमिका निश्चित करण्याचा प्रयत्न होणार असून, विविध राज्यांतील प्रतिनिधींमध्ये समन्वय वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे. देशभरातील ओबीसी समाजाचे लक्ष आता या महाअधिवेशनाकडे लागले आहे.


