मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुरू असलेल्या मोठ्या विसर्गाचा फटका नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याला बसला आहे. गोदावरी नदीला पूर आल्याने नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली असून खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुराचे पाणी मका, सोयाबीन, भाजीपाला तसेच इतर पिकांमध्ये शिरल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी उभी पिके आडवी झाली असून, हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पूरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत. पूर ओसरल्यानंतरही शेती पूर्वस्थितीत येण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.


