नाशिक शहरातील प्रमुख रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने कॅनडा कॉर्नर येथे सह्या आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात आयोजित करण्यात आले होते.

या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. नागरिकांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अंबादास खैरे, संजय खैरनार, नगरसेविका सीमा ठाकरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका केली.

आंदोलनकर्त्यांनी शहरातील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत, अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही सह्या मोहीम राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बाईटमध्ये पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव गेले असून अनेक जण जखमी झाले आहेत. काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

वाहतूक कोंडी, वेळेची आणि पैशाची नासाडी तसेच जीविताचा धोका वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला.