नाशिक :  नाशिकमध्ये २० ते २५ व्यावसायिक वाहन चालकांची लाखोंची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पिकअप, अशोक लेलँड, आयशरसह इतर व्यावसायिक वाहने परस्पर विक्री केल्याचा आणि काही वाहने स्क्रॅप केल्याचा दावा वाहन चालकांकडून करण्यात आला आहे.

नाशिक जिल्हा वाहतूक प्रमुख दिनेश साळवे यांच्या माहितीनुसार, या प्रकरणी अंबड एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

 

वाहने ताब्यात नसतानाही चालकांना बँकेचे हप्ते भरावे लागत असल्याने ते आर्थिक आणि मानसिक अडचणीत सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा करत वाहन चालकांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.