नाशिक : इगतपुरी तालुक्यातील भावली डॅम परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ला आणि लुटमार प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. या गुन्ह्यातील तीन फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा आणि इगतपुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. या कारवाईनंतर या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १२ वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकरणात यापूर्वी नऊ आरोपींना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, गुन्ह्यातील काही साथीदार फरार असल्याने त्यांचा शोध सुरू होता.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की फरार आरोपी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मुंडेगाव शिवारात मोटारसायकलवरून येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राहुल भोरू भागडे (वय २६), आकाश चंद्रकांत भोईर (वय २७) आणि कैलास अशोक भागडे (वय २८) या तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल भागडे आणि आकाश भोईर हे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध इगतपुरी आणि घोटी पोलीस ठाण्यात यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत.
या कारवाईमुळे भावली डॅम हल्ला आणि लुटमार प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या १२ झाली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. फरार आरोपींचा शोध आणि प्रकरणातील इतर बाबींचा तपासही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


