नाशिकच्या चुंचाळे शिवारातील घरकुल योजना परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अंबड एमआयडीसी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलीस निरीक्षक संतोष नरूटे यांनी थेट नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विशेषतः महिला मंडळाशी संवाद साधत महिलांच्या अडचणी आणि सुरक्षेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. 

चुंचाळे घरकुल परिसरातील नागरिकांच्या समस्या तळागाळात जाऊन जाणून घेण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला. यावेळी महिला आणि लहान मुलांशीही पोलिसांनी संवाद साधला. व्यवसाय करताना तसेच परिसरात वावरताना येणाऱ्या अडचणी महिलांनी पोलिसांसमोर मांडल्या.

कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा अडचण निर्माण झाल्यास नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष नरूटे यांनी केले. पोलिस अधिकारी थेट वस्तीत येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत असल्याने स्थानिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, परिसरातील शांतता बिघडवणाऱ्या आणि टवाळखोरी करणाऱ्या दोन ते तीन जणांवर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील टवाळखोरांवर वचक निर्माण झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे.

अंबड पोलिसांची ही कारवाई चुंचाळे घरकुल परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरली आहे.