नाशिकमधील कथित म्हाडा घोटाळा प्रकरणात सरकारवाडा पोलिसांनी आणखी मोठी कारवाई करत दोन मंडळ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. या प्रकरणात मंडळ अधिकारी दिलीप कचरू वामन आणि सेवानिवृत्त मंडळ अधिकारी श्याम एकनाथ बोरसे यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फेरफार नोंदी मंजूर करताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न केल्याचा आरोप या दोघांवर आहे. तपासात कथित बनावट मोजणी नकाशे, हिस्सा फॉर्म, गटबुक आणि इतर कागदपत्रांच्या आधारे फेरफार नोंदी प्रमाणित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तपास यंत्रणेच्या दाव्यानुसार, विकासक, जमीनमालक आणि गुंतवणूकदारांशी कथित संगनमत करून १४ सर्व्हे गटांमधील फेरफार नोंदी मंजूर करण्यात आल्या. या प्रकरणात म्हाडा आणि शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
यापूर्वी या प्रकरणात नायब तहसीलदार, भूमी अभिलेख अधिकारी, नगररचना अधिकारी आणि दोन बिल्डरांवरही कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत.


