नाशिकच्या मध्यवर्ती सीबीएस बसस्थानकावर बसमध्ये चढण्याच्या घाईतून तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. प्रवाशांसमोरच तरुणांमध्ये जोरदार राडा झाल्याने बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नाशिकच्या सीबीएस बसस्थानकावर दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी असते. त्यातच बस पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू असते. अशाच प्रकारे बसमध्ये आधी चढण्याच्या घाईतून काही तरुणांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला.

वाद वाढत गेल्यानंतर संबंधित तरुणांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. भर गर्दीत आणि प्रवाशांसमोरच हा प्रकार घडल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेचा व्हिडिओ उपस्थितांपैकी कोणीतरी मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी, तेही बसस्थानकासारख्या गर्दीच्या परिसरात अशा प्रकारे हाणामारी झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, या हाणामारीप्रकरणी संबंधित तरुणांवर काही कारवाई झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे घटनेनंतर प्रशासन आणि पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.