नाशिक : शिवाजीवाडी आणि पखालरोड परिसरातील नंदिनी नदीवरील पूल पावसाळ्यात नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. मुसळधार पावसानंतर नदीला पूर आल्याने पुलांवरून पाणी वाहू लागते आणि वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे परिसरातील सुमारे २५ हजार नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर नंदिनी नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. परिणामी शिवाजीवाडी–पखालरोड परिसरातील पुलांवरून वेगाने पाणी वाहू लागले. काही काळासाठी वाहतूक बंद ठेवावी लागली, तर वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला.

वडाळा नाका, पाथर्डी गाव, शिवाजीवाडी आणि परिसरातील हजारो नागरिक शहरात ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. मात्र, वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता विद्यमान पूल अपुरे पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पुराच्या काळात पुलाखाली मोठ्या प्रमाणात कचरा आणि झाडे अडकल्याने पाण्याचा निचरा मंदावतो आणि परिस्थिती आणखी गंभीर बनते. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

नंदिनी नदीवरील विद्यमान पुलांची उंची वाढवावी, सध्याच्या पुलांना समांतर नवीन पूल उभारावा आणि तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.