नाशिक : उत्तर महाराष्ट्राच्या प्रशासकीय सक्षमीकरणाच्या आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नाशिककरांची प्रदीर्घ काळाची मागणी मान्य करत केंद्र शासनाने स्वतंत्र 'नाशिक टपाल क्षेत्रा'च्या (Nashik Postal Region) स्थापनेला अखेर मंजुरी दिली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले आहे.

या नव्या निर्णयानुसार नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव आणि भुसावळ या पाच प्रमुख टपाल विभागांचा समावेश आता स्वतंत्र नाशिक टपाल क्षेत्रात होणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील तब्बल २३० मुख्य टपाल कार्यालये आणि १,५०६ शाखा टपाल कार्यालयांचे संचलन आता थेट नाशिकमधून केले जाईल.

यापूर्वी नाशिक व मालेगाव विभाग नवी मुंबई क्षेत्राशी, तर धुळे, जळगाव व भुसावळ विभाग छत्रपती संभाजीनगर टपाल क्षेत्राशी जोडलेले होते. वेगवेगळ्या प्रादेशिक कार्यालयांमुळे प्रशासकीय कामात अडचणी येत होत्या. आता सर्व विभाग एकत्र आल्याने टपाल सेवा, पार्सल वितरण आणि लॉजिस्टिक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम व जलद होणार आहे.

समृद्धी महामार्ग, रेल्वेचे नेटवर्क आणि हवाई वाहतुकीमुळे उत्तर महाराष्ट्रात उद्योग व व्यापाराचा मोठा विस्तार होत आहे. अशा वेळी स्वतंत्र टपाल क्षेत्रामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.