नाशिक : राज्यराणी एक्सप्रेसच्या एच-१ एसी बोगीतून ५ लाख ७२ हजार रुपये असलेली पर्स चोरी करणाऱ्या दोन आरोपींना इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी या चोरीचा उलगडा करत आरोपींपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यराणी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची रोख रक्कम असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या घटनेनंतर इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत रेल्वे स्थानके आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नाशिकमधून दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
या कारवाईमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून रेल्वे परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून चोरीतील रक्कम आणि इतर बाबींचा तपास करण्यात येत आहे.


