नाशिक : नाशिकरोड परिसरातील सुंदरनगर येथे अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सुमारे १० ते १५ कार आणि दुचाकींचे नुकसान झाल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञातांनी परिसरात उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सकाळी नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली. वाहनधारकांनी घटनेबाबत तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
तोडफोडीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलीसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


