येवला :  सटाणा नगर परिषदेकडून घरपट्टी आणि व्यवसाय करात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता येवल्यातही अशाच प्रकारच्या करसवलतीची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने यासंदर्भात येवला नगर परिषद प्रशासनाला निवेदन देत नागरिकांना आर्थिक दिलासा देण्याची मागणी केली आहे.

 

वाढत्या महागाईमुळे आणि आर्थिक भारामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच व्यापारी वर्ग अडचणीत सापडला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे घरपट्टी आणि व्यवसाय करात ५० टक्के सवलत लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय अतिरिक्त घरपट्टी कर रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली असून, व्यापारी वर्गालाही करसवलतीचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी संकेत शिंदे यांनी प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेऊन नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, अशी भूमिका मांडली आहे.

दरम्यान, प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे येवला नगर परिषद या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.