अर्नाळा : मुंबई लगतच्या विरारमधील अर्नाळा समुद्रकिनारी गुरुवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चार अल्पवयीन मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, चार अल्पवयीन मुले समुद्रकिनारी फिरण्यासाठी आली होती. यापैकी तीन मुले समुद्रात पोहण्यासाठी उतरली. दरम्यान, अचानक आलेल्या जोरदार लाटांमुळे मुलांचा तोल गेला आणि ते पाण्यात वाहून जाऊ लागले.

 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि जीवरक्षकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. यावेळी एका मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

 

मृत दोन्ही मुले नालासोपारा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यांचे वय 10 ते 14 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने नागरिकांनी समुद्रात उतरणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.