येवला-नागडे रोडवरील नागडा चौक परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
महत्त्वाची वैयक्तिक ओळखपत्रे अशा प्रकारे कचऱ्यात सापडल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
नागडे रेल्वे गेटजवळील चौफुली परिसरात रस्त्यालगत साचलेल्या कचऱ्यात ही कागदपत्रे आढळली.
एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओळखपत्रे सापडल्याने ही कागदपत्रे नेमकी कोणाची आहेत आणि ती कचऱ्यात कोणी टाकली, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आधार, पॅन आणि मतदान कार्ड यांसारख्या कागदपत्रांमध्ये नागरिकांची महत्त्वाची वैयक्तिक माहिती असते. त्यामुळे ही कागदपत्रे उघड्यावर पडल्याने गैरवापराची शक्यता निर्माण झाल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या प्रकारामागे नेमके कारण काय आहे, कागदपत्रे एकाच ठिकाणी कशी पोहोचली आणि ती कचऱ्यात टाकण्यात आली का, याबाबत चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि महत्त्वाची कागदपत्रे कचऱ्यात टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
वैयक्तिक ओळखपत्रांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आल्याने प्रशासन या प्रकाराची दखल घेणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


