नाशिकच्या सिडको परिसरातील मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून केस पेपर उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. उपचारासाठी येणाऱ्या अनेक रुग्णांना आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे प्रतीक्षा करावी लागत होती.

अखेर आज रुग्णालयात केस पेपरचा पुरवठा झाल्यानंतर उपचार सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त करत मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली.

गेल्या काही दिवसांपासून केस पेपरच्या तुटवड्यामुळे रुग्णालयातील नियमित कामकाजावर परिणाम झाला होता. विशेषतः ओपीडीसाठी येणाऱ्या रुग्णांना अधिक वेळ थांबावे लागत असल्याची तक्रार करण्यात येत होती.

सध्या पुरवठा सुरळीत झाल्याने परिस्थिती पूर्ववत झाली असली, तरी भविष्यात अशा प्रकारची समस्या पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी केस पेपरसह आवश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, अशी मागणी नागरिक आणि रुग्णांकडून करण्यात येत आहे.