अमरावती : कोरड्या दुष्काळामुळे मेंढपाळ समाजासमोर आर्थिक संकट उभे राहिले असून, चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे मेंढ्या-शेळ्यांचे संगोपन करणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मेंढपाळ समाजसेवक अर्जुन नामदेवराव महानर यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीत घोड्यावर बसून अनोखे आंदोलन करण्यात आले.

 

अमरावतीतील इर्विन चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मेंढपाळांनी मोर्चा काढला. पारंपरिक वाद्ये वाजवत घोड्यावर बसून काढलेल्या या मोर्चाच्या माध्यमातून मेंढपाळांच्या विविध समस्यांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

 

दुष्काळाच्या परिस्थितीत मेंढ्यांसाठी मोफत चारा आणि पाण्याची व्यवस्था करावी, चारा खरेदीसाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच पशुधनासाठी मोफत पशुवैद्यकीय तपासणी आणि औषधोपचारांची सुविधा द्यावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.

 

दुष्काळामुळे पशुधनाचे संगोपन करताना मेंढपाळांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देण्याची मागणीही करण्यात आली. शासनाने मेंढपाळांच्या प्रश्नांची दखल घेऊन तातडीने विशेष दुष्काळी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली.