अमरावती : शासकीय रुग्णालयांमध्ये गेल्या १७ वर्षांपासून काम करणाऱ्या मेस कामगारांनी तुटपुंज्या वेतनाच्या प्रश्नावरून अमरावतीत ठिय्या आंदोलन केलं. दरमहा केवळ ७ हजार ५०० रुपये वेतन मिळत असल्याचा दावा करत कामगारांनी शासनाच्या नियमानुसार वेतन देण्याची मागणी केली आहे.

 

जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील मेस कामगारांनी प्रहार सामाजिक जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात आंदोलन केलं. दररोज नऊ तास काम करूनही अपेक्षित वेतन मिळत नसल्याची भूमिका कामगारांनी मांडली.

 

वेतनवाढीसह शासनाच्या नियमानुसार वेतन मिळावं, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा शल्यचिकित्सक आणि कामगार आयुक्तांच्या खुर्च्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेण्याचा इशाराही कामगारांनी दिला आहे. या आंदोलनामुळे शासकीय रुग्णालयांतील मेस कामगारांच्या वेतनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.