वाशिम : वाशिम जिल्ह्यात ३५ वर्षीय विवाहित मुलीची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी तिच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हत्येनंतर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, तसेच अस्थिविसर्जनही झालं होतं. मात्र, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणाचा उलगडा झाला.
शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्राह्मणवाडा गावात २० ऑक्टोबरच्या रात्री ही घटना घडल्याची माहिती आहे. मुलीच्या विवाहबाह्य संबंधांवरून वडील नाराज असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. पोलिसांच्या चौकशीत वडिलांनी हत्येची कबुली दिल्याचं सांगण्यात आलं आहे.
या प्रकरणी मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, काटेपूर्णा नदीत अस्थिविसर्जन करण्यात आलेल्या ठिकाणाचा शोध घेऊन पुरावे मिळवण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. शिरपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


