राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या मुख्य सोहळ्यापूर्वी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे संपूर्ण कार्यक्रमाची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या आगमनापासून ते विविध धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांपर्यंत प्रत्येक व्यवस्थेची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे.

नाशिक विमानतळापासून रंगीत तालमीला सुरुवात होणार असून, त्यानंतर एमपीए गेस्ट हाऊस, रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर नियोजनाची तपासणी केली जाणार आहे. या प्रक्रियेत मान्यवरांची सुरक्षा, वाहनांची हालचाल, वाहतूक नियोजन, मंच आणि आसनव्यवस्था तसेच धार्मिक विधींच्या व्यवस्थेचा आढावा घेतला जाईल.

सायंकाळी सार्वजनिक कार्यक्रमस्थळ आणि गोदावरी महाआरतीच्या ठिकाणी अंतिम रंगीत तालीम होणार आहे. यावेळी महाआरती, शंखनाद, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्युत व्यवस्था आणि ध्वनियंत्रणेची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे.

३१ ऑक्टोबरच्या मुख्य सोहळ्यात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी ३२ विभागांना आवश्यक निर्देश दिले आहेत. रंगीत तालमीदरम्यान आढळणाऱ्या त्रुटींचे तातडीने निराकरण करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.

राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणाऱ्या सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील तयारीला महत्त्व प्राप्त झाले आहे.