समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर दरडी आणि दगड कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी संरक्षक जाळी बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे भरवीर ते इगतपुरी इंटरचेंजदरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक ठराविक वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत समृद्धी महामार्गावर वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत दरडी आणि दगड कोसळण्याचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी संरक्षक जाळी बसवण्याचे काम करण्यात येणार आहे.

 

या कामासाठी दररोज तीन वेळा मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. सकाळी दहा ते अकरा, दुपारी एक ते दोन आणि दुपारी चार ते पाच या वेळेत वाहतूक रोखण्यात येणार आहे. त्यामुळे या वेळेत समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आपल्या प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.

 

वाहतूक ब्लॉकमुळे प्रवासाच्या वेळेत बदल होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहनचालकांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी वेळेचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संरक्षक जाळी बसवण्याच्या कामामुळे दरडी आणि दगड कोसळण्याचा धोका कमी करण्यास मदत होणार आहे. समृद्धी महामार्गावरील या कामाची माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली असून, २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी निर्धारित वेळेतील वाहतूक बंदची नोंद घेऊन प्रवास करावा.