नाशिक : कोजागरी पौर्णिमेचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, शहरातील दूध बाजारपेठेत आतापासूनच लगबग सुरू झाली आहे. कोजागरीच्या रात्री चंद्रप्रकाशात मसाला दूध पिण्याची परंपरा असल्याने या दिवशी दुधाला विशेष महत्त्व असते.
पावसाळा संपून आकाश निरभ्र होऊ लागते आणि चंद्राचे तेज अधिक खुलून दिसते. त्यामुळे या पौर्णिमेला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. तसेच अशी मान्यता आहे की, कोजागरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ‘को जागर्ति?’ म्हणजेच ‘कोण जागे आहे?’ असा प्रश्न विचारते. जे जागे राहून देवीची भक्तिभावाने पूजा करतात, त्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होते, अशी श्रद्धा आहे. याच ‘को जागर्ति?’ या शब्दांवरून ‘कोजागरी’ हे नाव पडल्याचे सांगितले जाते.
विशेष म्हणजे कुटुंबीय आणि मित्रमंडळी एकत्र येऊन चंद्रदर्शनासोबत जागरण करत मसाला दुधाचा आस्वाद घेतात. त्यामुळे या सणाच्या पार्श्वभूमीवर दुधाची मागणी वाढण्याचा अंदाज दूध व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
सध्या बाजारात म्हशीचे दूध प्रतिलिटर शंभर रुपये, तर गायीचे दूध साठ रुपये दराने विकले जात आहे. कोजागरीच्या काळात म्हशीच्या दुधाची मागणी वाढल्यास दर प्रतिलिटर ११० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, गायीच्या दुधाच्या दरात फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मसाला दूध तयार करण्यासाठी दूध, साखर, वेलची, केशर आणि सुका मेवा यांचा वापर केला जातो. त्यामुळे या काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना विशेष मागणी असते.
दरम्यान, मिठाई उत्पादकांकडूनही मोठ्या प्रमाणावर दुधाची मागणी नोंदवली जात आहे. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी काही ग्राहक आणि व्यावसायिकांनी दुधाची आगाऊ नोंदणी केली आहे. दिवाळीपर्यंत ही मागणी कायम राहण्याची अपेक्षा आहे.
मात्र, मागील वर्षी अपेक्षित मागणी प्रत्यक्षात कमी राहिल्याने यंदा दूध व्यावसायिक सावध आहेत. त्यामुळे यंदाच्या कोजागरीला दुधाची मागणी किती वाढते आणि दरात किती बदल होतो, याकडे बाजारपेठेचे लक्ष लागले आहे.


