नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ऐतिहासिक अनकाई किल्ल्यावर दर्शनासाठी आलेल्या अमित धोंडीभाऊ धुळगंड यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ते संगमनेर येथून दर्शनासाठी आले होते. डोंगरावरून खाली आणत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित धुळगंड यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ही बाब समजताच स्थानिक ग्रामस्थ आणि युवकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यांना खाली आणण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला.
या वेळी सागर सोनवणे, अक्षय वैद्य, नितीन व्यापारी, नितीन सुराडे, पोलीस पाटील संतोष परदेशी, शरद देवकर, लहानू सोनवणे, किरण जाधव आणि शुभम शिंदे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी मृतदेह डोंगरावरून खाली आणण्यासाठी मदत केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


