आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. वनहक्कांचे दावे निकाली काढण्यासह विविध मागण्यांसाठी भिवंडीतील दिवे येथून मंत्रालयाच्या दिशेने संविधान हक्क संघर्ष मोर्चा काढण्यात आलाय . शासनाने मागण्यांवर ठोस लेखी निर्णय द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या मोर्चासाठी भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ, ठाणे आणि पालघर परिसरातून संघटनेचे कार्यकर्ते दाखल झाले आहेत. प्रलंबित मागण्यांवर कालमर्यादेसह लेखी निर्णय देण्याची भूमिका संघटनेने मांडली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा सीता घाटाळ यांनी आदिवासींच्या मागण्यांसंदर्भात संघटनेची भूमिका मांडली. आता या मागण्यांवर शासनाकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.


