शहरातील सिव्हिल लाईन परिसरात झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. फिंगरप्रिंट्स, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथे कारवाई केली. या कारवाईत सुमारे ४० लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच संशयित पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.

 

गोंदियातील सिव्हिल लाईन परिसरात १४ ते १५ ऑक्टोबरदरम्यान ही घरफोडी झाली होती. घरमालक अमोल श्रीराम मुंगमोडे कामानिमित्त मुंबईला गेले होते, तर त्यांची पत्नी आणि आई साकोली येथे गेल्या होत्या. घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले आणि सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंगमोडे यांच्या पत्नीने लॉकरमधील सोन्याचे दागिने घरी आणले होते. घराची रेकी करून चोरी करण्यात आल्याचा संशय घरमालकांनी व्यक्त केला आहे.

 

तपासादरम्यान संशयित इंदूरमध्ये नातेवाइकांकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गोंदिया पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना झाले. मात्र, पोलीस येत असल्याची चाहूल लागताच संशयित तेथून पसार झाला.

पोलिसांनी संशयिताच्या नातेवाइकांच्या घरातून सुमारे ४० लाख रुपये किमतीचे २६ तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीचे नाणे जप्त केले आहे. चोरीच्या या प्रकरणात आणखी आरोपी सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.